निवडणूक आचारसंहितेमुळे मंदिर संस्थानचा निर्णय
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने दर्शन व्यवस्थेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम २०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे नवरात्रोत्सव कालावधीत सर्व रेफरल देणगी दर्शन पास बंद ठेवण्यात येणार आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. १० ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्वांना सुलभ दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत.
निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने या कालावधीत रेफरल देणगी दर्शन पास बंद राहतील. मात्र, भाविकांसाठी सशुल्क दर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. यामध्ये घाटशीळ पार्किंग येथे ३०० रुपयांचा सशुल्क दर्शन पास मिळणार आहे. तसेच प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर एक हजार रुपयांचा सशुल्क दर्शन पास वितरित करण्यात येणार आहे.





