जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ
धाराशिव : सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवारी (दि. ८) धाराशिव शहरात सायकल व ई-बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीत विविध शाळांमधील सुमारे ४०० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडेसात वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली रॅली बसवेश्वर चौक, बार्शी रोडमार्गे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे पोहोचली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.
शासकीय सेवा नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करणे तसेच युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यासोबतच सायकलचा नियमित वापर, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व रॅलीच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.
रॅलीच्या शुभारंभप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नावरे, आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे आणि प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
चारशे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
या रॅलीत सुमारे ४०० विद्यार्थी आणि युवकांनी सहभाग घेत आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सायकलचा वापर वाढविणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे महत्त्व या उपक्रमातून पटवून देण्यात आले.
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, अक्षय बिरादार, क्रीडा मार्गदर्शक शुभांगी रोकडे, विश्वास खंदारे, डिंपल ठाकरे, जान्हवी पेठे, संपदा मोरे, किशोर भोकरे आणि सुरेश कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सेवेचा संकल्प, आरोग्याचा जागर आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार अशा तिन्ही बाबींचा संदेश देणारी ही रॅली विद्यार्थी व युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लक्षवेधी ठरली.





