१०१ आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र
७८ आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे आणि २३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश
धाराशिव : राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. जिल्ह्यातील ७८ आयुष्मान आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे आणि २३ प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण १०१ आरोग्य संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानंतर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पथकांकडून या संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले. निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता केल्यामुळे १०१ आरोग्य संस्थांना राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाले आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही कामगिरी केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांचे नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या यशात महत्त्वपूर्ण ठरला आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शासकीय आरोग्य संस्थांमधील सेवांचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांना सुरक्षित, प्रभावी व रुग्णाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य संस्थांमधील पायाभूत सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा सेवा, स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण आणि अभिलेख व्यवस्थापन अशा विविध बाबांची तपासणी केली जाते.
जिल्ह्यातील संबंधित आरोग्य संस्थांनी या सर्व निकषांची पूर्तता करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आवश्यक औषधे व उपकरणांची उपलब्धता, स्वच्छता, परिसर व्यवस्थापन, वैद्यकीय सेवांची गुणवत्ता, रुग्णांचे समाधान आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी अद्ययावत करण्यात आल्या. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकनात संबंधित संस्थांना यश मिळाले.
या यशामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, डॉ. कुलदीप मिटकरी, डॉ. विनयशील कुलकर्णी, डॉ. मारुती कोरे, डॉ. सुशील चव्हाण, डॉ. पंकज शिनगारे, जीवन कुलकर्णी, किशोर गवळी, किशोर तांदळे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, प्रयोगशाळा कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्रासोबत संबंधित आरोग्य संस्थांना प्रोत्साहनपर निधीही मिळणार आहे. या निधीच्या माध्यमातून आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. तसेच प्रमाणपत्र प्राप्त संस्थांनी भविष्यातही गुणवत्तेचा दर्जा कायम राखावा, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील १०१ आरोग्य संस्थांना मिळालेले राष्ट्रीय प्रमाणपत्र हे ग्रामीण आरोग्य सेवांच्या गुणवत्तावाढीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. नागरिकांना त्यांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वेळेवर, सुलभ, सुरक्षित आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी या कामगिरीचा मोठा फायदा होणार आहे.






