सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
धाराशिव : खरीप २०२० मधील सोयाबीनच्या पीक विम्यावरून विमा कंपनीने तांत्रिक अडथळे निर्माण करीत केलेली चाल ढकल आता थांबणार आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारखेला ‘अंतिम’ सुनावणी घेण्याचे आदेशित केले आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विमा कंपनीचे सर्व तांत्रिक दावे ऐकून घेतले, उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर या प्रकरणावर ‘अंतिम सुनावणी’ घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील चार वर्षांपासून लढा देणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान, विमा कंपनीने पुन्हा एकदा तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत उच्च न्यायालयात जमा असलेल्या ७५ कोटी रुपयांच्या बाबतीत तीव्र आक्षेप घेत मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांचा अवमान झाला असल्याचा कांगावा करत गोंधळ निर्माण करण्याचा आणि खटला लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी बांधवांच्या वतीने बाजू मांडणारे केंद्र सरकारचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. बलबीर सिंग यांनी याबाबत असलेले वास्तव मा. सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणत सुरुवातीपासून कंपनी कशी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे हे लक्षात घेऊन अंतिम सुनावणीला लवकरात लवकर वेळ देण्याबाबत न्यायालयाकडे आग्रह केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आमदार पाटील यांनी दिल्लीत विधिज्ञासोबत आखलेली रणनीती आली कामी
खरीप २०२० आणि २०२१ च्या प्रलंबित विम्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्लीत उपस्थित राहत काल व आज केंद्र सरकारचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. बलबीर सिंग आणि अॅड. सुधांशू चौधरी,अॅड.शिंदे यांच्यासह लीगल टीम सोबत झालेल्या बैठकीत आखलेली रणनीती फळाला आली असून, विमा कंपन्यांच्या आडमुठ्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात मोठी आघाडी घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिल्लीपर्यंत लढा
विमा कंपन्यांनी कितीही तांत्रिक अडथळे आणले, तरी शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. उच्च न्यायालयाचा निकाल हा सत्याचा विजय असून, सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांचाच विजय होईल. ठाकरे सरकारच्या काळात या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, मात्र आपण हार मानली नाही. शेतकरी बांधवांच्या मदतीने कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा नेला. आता विमा कंपनीची कोणतीही युक्ती चालणार नाही. उन्हाळी सुट्टीनंतर होणारी अंतिम सुनावणी शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस घेऊन येईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.






