नवी दिल्लीत ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्कार प्रदान
धाराशिव : सहकारक्षेत्रात सातत्यपूर्ण प्रगती, प्रभावी व्यवस्थापन आणि व्यवसायवृद्धीच्या जोरावर धाराशिव येथील श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडने राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. संस्थेला प्रतिष्ठेच्या ‘एक्सलन्स इन बिझनेस ग्रोथ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) आयोजित ‘इंडियन कोऑपरेटिव्ह समीट अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या राष्ट्रीय सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने मुख्याधिकारी राजेश जाधव आणि सह मुख्याधिकारी अरविंद गोरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासह केंद्रीय सहकार विभागातील विविध मान्यवर उपस्थित होते.
सभासदांचा विश्वास संपादन करताना पारदर्शक आर्थिक व्यवहार, आर्थिक शिस्त, दर्जेदार ग्राहक सेवा आणि सक्षम व्यवस्थापन या बाबींना संस्थेने सातत्याने प्राधान्य दिले आहे. याच बळावर संस्थेने व्यवसायवृद्धी साधत सहकार क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. संस्थेच्या या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत पुरस्काराने गौरवण्यात आल्याने धाराशिवच्या सहकार क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सामूहिक योगदानामुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार म्हणजे संस्थेवर सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या पुरस्कारामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून, सहकाराच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी, विश्वासार्ह सेवा आणि समाजाभिमुख कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे. श्री सिद्धिविनायक मल्टिस्टेटच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


