दुष्काळात धाराशिवकरांना दिलासा
धाराशिव : यंदाच्या वर्षी अत्यंत भीषण दुष्काळ पडल्यामुळे पाण्याला अमृताचे मोल आले आहे. धाराशिव नगर परिषदेने तातडीने केलेल्या कारवाईमुळे या दुष्काळात धाराशिवकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. तेरणा जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज वाया जाणारे सुमारे तीन लाख लिटर पाणी वाचवण्यात अखेर नगर परिषद प्रशासनाला यश आले आहे. बिघडलेल्या व्हॉल्व्हची दुरुस्ती करून ही गळती बंद करण्यात आली असून, दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीच्या दृष्टीने ही दिलासादायक घटना घडली आहे.
शहरातील नागरिकांना नियमित, वेळेवर आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने पाणीपुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजपा युवा नेते मल्हार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा समितीचे सभापती विलास लोंढे यांनी अधिकाऱ्यांसमवेत तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली होती.
या पाहाणीवेळी केंद्रातून दररोज जवळपास तीन लाख लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचे निदर्शनास आले. या पूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही या केंद्राची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आणि पाण्याची गळती थांबवण्यात आली. त्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा अपव्यय रोखला जाणार आहे.
दरम्यान, दुष्काळाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने जलशुद्धीकरण केंद्रासह संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेवर नियमित देखरेख ठेवावी, कोणत्याही ठिकाणी गळती आढळल्यास तातडीने दुरुस्ती करावी, तसेच नागरिकांना वेळेत आणि शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना लोंढे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित मुंढे, विद्युत अभियंता सिद्धार्थ मोरे, ठेकेदार राजाभाऊ पवार, संजय मोरे आणि कन्सल्टंट सतीश राठोड उपस्थित होते.



