विवाहबाह्य संबंधांमुळे आठ महिन्यांतच मोडला संसार
भूम : लग्नाला अवघे आठ महिने झालेले असतानाच २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यात घडली आहे. पत्नीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने त्याला विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रामकुंड शिवारातील कुंथलगिरीच्या डोंगरदरीत तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरोधात पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
गोविंद कागदे (वय २७, रा. गोलेगाव, ता. वाशी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास रामकुंड शिवारात ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रामकुंड ते भूम मार्गावरील कुंथलगिरीच्या डोंगरदरीत गोविंद यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या तसेच डोक्यात दगड घालून हत्या केल्याच्या खुणा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गोविंद आणि अंजली यांचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, अंजलीची या विवाहाला संमती नव्हती, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. दरम्यान, अंजली यांचे शुभम खोसरे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. या संबंधांना गोविंद यांचा विरोध होता. त्यातूनच दोघांनी संगनमत करून गोविंद यांची हत्या केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
गोविंद यांचे चुलत बंधू ज्ञानेश्वर कागदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंजली कागदे आणि शुभम खोसरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवघ्या आठ महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार अशा दुर्दैवी घटनेने संपुष्टात आल्याने गोलेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.



