विजयादशमीनिमित्त महाविद्यालयातील ‘ज्ञानदुर्गां’चा अनोखा उपक्रम
ग्रंथपूजनातून दिला ज्ञान आणि वाचनसंस्कृतीचा संदेश
धाराशिव : भारतीय संस्कृतीत विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन आणि आयुधपूजनाला विशेष महत्त्व आहे. बदलत्या काळानुसार आयुधांचे स्वरूप बदलले असले, तरी ज्ञानाचे महत्त्व कायम आहे. याच विचारातून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘ज्ञानदुर्गां’नी विजयादशमीनिमित्त ग्रंथालयातील पुस्तकांचे पूजन करून आयुधपूजनाला अनोखे स्वरूप दिले. पारंपरिक सणाला ज्ञानसंस्कृतीची जोड देणारा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. सुनीता गुंजाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध विभागांतील प्राध्यापिका आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
भारतीय संस्कृतीत दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र, आजच्या ज्ञानाधिष्ठित युगात पुस्तके हीच विचारांची शस्त्रे असून, ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे. अज्ञानावर विजय मिळविण्यासाठी शिक्षण हेच सर्वांत प्रभावी आयुध असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ग्रंथालयातील पुस्तकांचे विधिवत पूजन करून ज्ञानाविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, ‘विजयादशमीच्या दिवशी आयुधपूजनाला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या काळात ज्ञान हेच आपले खरे आयुध असून, पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे महाविद्यालयातील ‘ज्ञानदुर्गां’नी ग्रंथालयातील पुस्तकांचे पूजन करून आयुधपूजनाला वेगळे आणि अर्थपूर्ण स्वरूप दिले आहे. हा उपक्रम केवळ परंपरा जपणारा नसून ज्ञानाविषयी आदर निर्माण करणारा, वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणारा आणि शैक्षणिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.’
कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. सुनीता गुंजाळ यांनी उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली. सण-उत्सव हे केवळ परंपरा जपण्यापुरते मर्यादित नसून, त्यांना वर्तमानाशी जोडून नवा अर्थ देण्याची संधी असते. विजयादशमीनिमित्त ग्रंथपूजन करण्यामागे ज्ञानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, वाचनसंस्कृतीला चालना देणे आणि शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकाने ज्ञानसाधनेप्रती आपली बांधिलकी जपणे, हा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक आयुधपूजनाला आधुनिक शैक्षणिक विचारांची जोड देत ज्ञानाचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक ग्रंथपाल बिभीषण सिरसट, सविता नलावडे, सूक्ष्मा टेकाळे, संभाजी धत्तुरे, सुनीता कुंभार आणि अजमेर मुलानी यांनी विशेष सहकार्य केले.




