धाराशिव : ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच GPAT ही फार्मसी क्षेत्रातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा देशपातळीवरील असून या परीक्षेच्या निकालावर पदव्युत्तर (एम. फार्मसी) प्रवेश निश्चित होतो. तसेच या परीक्षेतील गुणांच्या आधारे विविध सरकारी संस्था, फार्मास्युटिकल कंपन्या, आणि संशोधन संस्था विद्यार्थ्यांची निवड करतात.
तेरणाची परंपरा कायम ठेवत यंदाच्या GPAT २०२६ परीक्षेत तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धाराशिव येथील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यावर्षी दोन विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ओंकार संजय गंजे याला 190 तर सुमित सुभाष चोपडे याला 187 गुण मिळाले आहेत. या परीक्षेत यश मिळाल्यामुळे पुढील उच्च शिक्षण सुरू असताना या दोन्ही विद्यार्थ्यांना दरमहा 12,400 असे विद्यावेतन मिळणार आहे.
या यशाबद्दल बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले, “यापूर्वीही फार्मसी विभागातील मागील चारवर्षामंध्ये २० हून अधिक विद्यार्थ्यांनी GPAT परीक्षेत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना फार्मसीचे सखोल ज्ञान मिळण्यासाठी संस्थेचा हायर एज्युकेशन सेल पहिल्या वर्षापासूनच सातत्याने प्रयत्नशील असतो. या यशात विभागातील प्रा. अबूसुफियान काझी यांचा मोलाचा वाटा आहे.” प्राचार्यांनी पुढे आशा व्यक्त करताना सांगितले की, “भविष्यकाळात हे विद्यार्थी नक्कीच नामांकित कंपनीत किंवा सरकारी अधिकारी अशा पदांवर कार्यरत होतील. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो.”
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे सत्कार करत असताना आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आमची अहोरात्र मेहनत आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन झाले. शिक्षकांनी वेळोवेळी दिलेली साथ आणि हायर एज्युकेशन सेलचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला योग्य दिशा मिळाली.”







