आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचाही मागणीला पाठिंबा
धाराशिव : लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरीसाठी जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधींपासून वंचित ठेवता कामा नये. प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींचा योग्य मोबदला मिळावा आणि स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकरीत प्राधान्य द्यावे, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पाठिंबा दिला.
डॉ. पाटील यांनी या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले विलास मुळे यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आणि आंदोलकांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्या, समस्या आणि प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. भूमिपुत्रांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी हा परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पासाठी ज्या स्थानिक नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांना विकासाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे गरजेचे आहे. भूमिपुत्रांच्या योगदानाची योग्य दखल घेऊन त्यांना रोजगारात प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
‘प्रकल्प उभारणीसाठी भूमिपुत्रांनी जमीन दिली; आता त्यांना हक्काचा रोजगार मिळाला पाहिजे,’ अशी भूमिका मांडत त्यांनी स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मराठवाड्यात मोठे उद्योग आणि विकास प्रकल्प उभे राहत असताना येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी इतरत्र जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
अधिग्रहित जमिनींचा योग्य मोबदला, भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य आणि कायमस्वरूपी नोकरी यांसारख्या मागण्या मार्गी लावण्यासाठी संबंधित शासन यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार डॉ. पाटील यांनी दिले.
या वेळी सक्षना सलगर, लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, अमृता काळदाते, नागनाथ शिंदे, कपिल धावड, धीरज मुळे, अनिल पवार, ओंकार बुद्धिबार, अनिल पंचाळ, शुभम शिंदे, रामेश्वर पवार, प्रवीण साळुंके, सुनील पवार, अशोक मुळे, अमर बोचरे, जगदीश पाटील यांच्यासह अनेक आंदोलक उपस्थित होते. भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभ्या राहणाऱ्या विकास प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळाले पाहिजे, हीच या आंदोलनाची प्रमुख भूमिका असून, त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.


