स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दरोड्यातील फरार आरोपीही जाळ्यात
धाराशिव : येरमाळा, वाशी परिसरासह विविध ठिकाणांहून पवनचक्कीच्या विद्युत वाहिनीवरील तांबे व अॅल्युमिनियमच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच संशयितांना पकडण्यात आले असून, चोरीच्या तारा खरेदी केल्याच्या आरोपावरून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चार गुन्हे उघडकीस आणत तांबे व अॅल्युमिनियमच्या तारांसह पिकअप आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ५ ऑक्टोबर रोजी मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याच्या साथीदारांनी येरमाळा, वाशी परिसरातील विविध ठिकाणांहून पवनचक्कीच्या विद्युत वाहिनीच्या तारा चोरून आणल्या असून त्या पिकअपमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
या माहितीवरून पोलिसांनी मांडवा शिवारात धाव घेतली. तेथे एक पिकअप व दोन मोटारसायकली उभ्या होत्या. आठ ते दहा जण पिकअपमध्ये तारांचे बंडल टाकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधितांनी पळ काढला. पथकाने पाठलाग करून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम अजिनाथ शिंदे (वय २६, रा. मांडवा), लाला गोविंद पवार (वय २४, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, ह.मु. मांडवा), आकाश श्रीरंग पवार (रा. वरुडा), पवन कालिदास काळे (वय २२, रा. वरुडा) आणि पिकअप चालक अंगद प्रल्हाद शिंदे (वय ३२, रा. घोसापुरी, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून पळून गेलेल्या अन्य चौघांची नावेही पोलिसांना मिळाली आहेत.
चौकशीत तेरखेडा, इंदापूर व ढोकी शिवारातील पवनचक्कीच्या नवीन पोलवरील विद्युत वाहिनी कापून तारा चोरल्याची माहिती समोर आली. तसेच चोरीच्या मोठ्या प्रमाणातील तारा धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला विकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचाही शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याने संबंधितांकडून चोरीच्या तारा घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत चार गुन्हे उघडकीस आले असून तांब्याची तार, अॅल्युमिनियमची तार, पिकअप व दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या शाम शिंदे याच्यावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात तो फरार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच स्थानिक गुन्हे शाखा व क्यूआरटी पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.



