२२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे कार्यारंभ आदेश जारी; आजच होणार शुभारंभ
धाराशिव : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिवकरांना २२ कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट मिळाली आहे. शहरातील विविध भागांतील विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २२ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश आज जारी करण्यात आले असून, या कामांचा शुभारंभही आजच करण्यात येत आहे.
धाराशिव शहरातील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहरातील विकासकामांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ही कामे होणार असून दलित वस्ती सुधारणा, दलितेतर वस्ती सुधारणा तसेच नगरोत्थान अशा तीन विविध योजनांच्या माध्यमातून ही विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे कार्यारंभ आदेश आजच जारी झाल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामामुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्येही महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहे.





