नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांचा पुढाकार
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक २० मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती विलास (बापू) लोंढे यांनी पुढाकार घेतला आहे. जुना बस डेपो परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन तीन वेगवेगळ्या ठिकाणी बोअरवेल घेण्यात आल्या. विशेष म्हणजे तिन्ही बोअरवेलला पाणी लागल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेते मल्हार पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने बोअरवेल घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या कामाची सुरुवात करण्यापूर्वी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांच्या हस्ते बोअरवेलचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यामध्ये शाळा क्रमांक १३ येथील बोअरवेलला दोन इंच, रहीबर चौकातील बोअरवेलला तीन इंच, तर डोंगरवस्ती परिसरातील बोअरवेलला दोन इंच पाणी लागले आहे.
प्रभागातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर असताना केवळ मागण्यांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उपाययोजना करण्यावर विलास (बापू) लोंढे यांनी भर दिला. तिन्ही ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात हलका होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाबद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांचे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी आभार मानले.




