माधवी, कविताची राज्याच्या संघात निवड
धाराशिव : राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या मुलीच्या संघाने १९ वर्षे वयोगटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला. कोल्हापूरमध्ये झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळकोटच्या राजर्षि शाहू कनिष्ठ महाविद्यालय या संघाने धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच या विजयी संघातील माधवी जाधव, कविता बोडके या दोन खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड झाली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या या विजयी संघामध्ये नंदिनी वड्डू, कविता बोडके, श्रेया सपकाळ, आरुषी चव्हाण, माधवी जाधव, शर्वरी पाटील, अक्षता कामते, समृद्धी मुंगुरूकर, वैष्णवी बाबर, साक्षी मिसाळ, श्रेया कुंभार, तृप्ती रसाळ यांचा समावेश होता.
कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठात १२ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेतील सामने झाले. या संघाला क्रीडा शिक्षक प्रा. सुरेश कोकाटे, दीपराज जामकर यांचे मार्गदर्शन लाभले. या संघातील वैष्णवी बाबर व साक्षी मिसाळ या भूम येथील स्वराज क्रीडा मंडळाच्या खेळाडू आहेत. आयोजकांच्या वतीने विजयी संघांचा सत्कार करण्यात आला.
संघाच्या या यशाबद्दल माजी सभापती व संस्था पदाधिकारी प्रकाश चव्हाण, प्राचार्य संतोष चव्हाण, राज्य कबड्डी मार्गदर्शक विश्वास खंदारे, मुख्याध्यापिका पवार मॅडम यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.




