आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी उजनी धरणातून १ टीएमसी पाणी देण्याबाबतचा शासन आदेश निर्गमित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
जिल्ह्यात केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, उपलब्ध पाणीसाठ्यातून पुढील दहा महिने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविणे अत्यंत कठीण असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.
यावेळी उजनी धरणातून १ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी सकारात्मकतेने मान्य केली होती.
त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेत शासन आदेश निर्गमित केला आहे. यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
दुष्काळाच्या तीव्र संकटात धाराशिव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.





