पुणे ; अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करण्यावरुन नाराज असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला होता. माज मुंबईमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुक लढवणार असल्याची चर्चा असून तशी बोलणी दोन्ही पक्षांमध्ये सुरु आहे. मात्र शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या युतीला विरोध केला. ही आघाडी झाल्यास पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची या विषयावर सविस्तर चर्चा देखील झाली. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात आले मात्र त्याला यश आले नाही. अखेर त्यांनी दोन दिवसांपूर्वी शहराध्यक्ष पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर असल्याची देखील चर्चा सुरु होती. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.









