मुदत न पाळणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा
धाराशिव : गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, ही कामे केवळ कागदावरील उद्दिष्टपूर्तीपुरती मर्यादित न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रगतिपथावर असलेल्या जल जीवन मिशनच्या कामांना गती देऊन ती विहित मुदतीत पूर्ण करा. विशेषतः अंतिम टप्प्यात पोहोचलेली कामे तातडीने मार्गी लावा. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर निविदेतील अटी व शर्तींनुसार कठोर कारवाई करा, आवश्यकतेनुसार त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह संबंधित अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता,T PI सहाय्यक, लेखा कर्मचारी तसेच PMC WAPCOS चे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एकूण ५९४ कामे सुरू असून, त्यापैकी ३४६ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित २४८ कामे प्रगतिपथावर आहेत. प्रगतिपथावरील कामांमध्ये शून्य ते २५ टक्के प्रगती झालेली २२ कामे, २५ ते ५० टक्के प्रगतीची ३९ कामे, ५० ते ७५ टक्के प्रगतीची ९३ कामे,तर ७५ ते ९९ टक्के प्रगती झालेली ९४ कामे आहेत.



