शासकीय वाहनातून जखमींना रुग्णालयात केले दाखल
उपचारांची व्यवस्था होईपर्यंत रुग्णालयात थांबून दाखवली संवेदनशीलता
धाराशिव : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत रस्ते अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याला तातडीने मदतीचा हात दिला. उमरगा येथून धाराशिवकडे परतत असताना तुळजापूर-लातूर मार्गावरील काक्रंबा येथे दुचाकी अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीला त्यांनी स्वतःच्या शासकीय वाहनातून रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे, जखमींवर उपचार सुरू होईपर्यंत ते स्वतः रुग्णालयात थांबले होते.
उमरगा येथील दौरा आटोपून धाराशिवकडे परतत असताना काक्रंबा येथे सुनील बेंद्रे आणि त्यांच्या पत्नी पद्मावती बेंद्रे यांचा दुचाकीवरून जाताना अपघात झाल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ आपले वाहन थांबवले आणि जखमी दाम्पत्याची विचारपूस केली.
अपघातस्थळी रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब होणार असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही यंत्रणेची वाट न पाहता जखमींना आपल्या शासकीय वाहनातून सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमी दाम्पत्याला वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.
रुग्णालयात दाखल केल्यानंतरही जिल्हाधिकारी पुजार यांनी जखमींची साथ सोडली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह ते उपचारांची आवश्यक व्यवस्था होईपर्यंत रुग्णालयात उपस्थित राहिले. जखमींना योग्य उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी विशेष दक्षता घेतली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीही जिल्हाधिकारी पुजार यांनी रस्ते अपघातातील जखमींच्या मदतीसाठी आपले शासकीय वाहन थांबवून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अपघातग्रस्तांना मदत करत संवेदनशील प्रशासनाचे उदाहरण समोर ठेवले आहे.
जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच सामान्य नागरिकांच्या अडचणीच्या प्रसंगी तत्परतेने मदतीला धावून जाणाऱ्या कीर्ती किरण पुजार यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
