रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तहसीलदारांना निवेदन
परंडा – धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे तसेच मागासवर्गीय समाजातील नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत द्यावी तसेच इतर मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने परंड्याच्या तहसीलदारांना देण्यात आले.
या निवेदनात दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय कुटुंबांना, शेतकऱ्यांना पीककर्ज व इतर पात्र कृषी कर्जातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाशी समन्वय साधून कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पात्र बाधित कुटुंबाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ तसेच इतर संबंधित महामंडळांकडून कर्ज घेतलेल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफी किंवा कर्जवसुलीत सवलत द्यावी. नवीन कर्जप्रकरणे मंजूर करून पात्र लाभार्थ्यांना व्यवसाय व स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागासवर्गीय कुटुंबांच्या जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, चाऱ्याची उपलब्धता करावी आणि आवश्यक पशुधन संरक्षणाच्या उपाययोजना राबवाव्यात. तसेच दलित वस्त्यांमध्ये बोअरवेलमधील पाणी कमी झालेल्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
महिला बचतगटांच्या कर्जदारांना कर्जमाफी देऊन कर्जवसुली तात्पुरती थांबवावी, दलित वस्त्यांमधील महिलांनी खासगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जांची तातडीने वसुली थांबवावी, तसेच मागासवर्गीय कुटुंबांना स्वाधार योजनेचा लाभ तातडीने मिळावा, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेशचे सचिव संजयकुमार बनसोडे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन परंड्याच्या तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी धाराशिव आणि परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.




