व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठीही स्वतंत्र प्लॅन
नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी प्रीपेड मोबाईल ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी संसदेत उपस्थित केलेल्या मोबाईल रिचार्जच्या मुद्द्याची दखल घेत केंद्र सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी पूर्ण 30 दिवसांच्या वैधतेचा रिचार्ज पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.
यापूर्वी अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून 28 दिवसांच्या वैधतेचे रिचार्ज प्लॅन दिले जात होते. त्यामुळे ग्राहकांना वर्षभर मोबाईल सेवा सुरू ठेवण्यासाठी 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागत होता. आता 30 दिवसांच्या रिचार्जचा पर्याय उपलब्ध होणार असल्या ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
यासोबतच इंटरनेट किंवा मोबाईल डेटाची गरज नसलेल्या ग्राहकांसाठी केवळ व्हॉइस कॉल आणि एसएमएस सुविधांचा समावेश असलेले स्वतंत्र प्लॅन उपलब्ध करून देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि प्रामुख्याने कॉलिंगसाठी मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. त्यांना गरज नसतानाही डेटा असलेला रिचार्ज घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
राघव चड्ढा यांनी मार्च २०२६ मध्ये संसदेत हा मुद्दा उपस्थित करत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडण्याचा पर्याय मिळावा, अशी मागणी केली होती. नव्या निर्णयानंतर त्यांनी केंद्र सरकार आणि TRAIचे आभार मानले आहेत. ग्राहकांनी वापरलेल्या आणि आवश्यक असलेल्या सेवांसाठीच पैसे मोजावेत, या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.



