देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचा सहाभाग असणाऱ्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असणाऱ्या मुंबई शहराच्या दिशेनं दर दिवशी अनेकांचीच पावलं वळतात. अशा या मुंबई शहरामध्ये असणाऱ्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रशासकीय कार्यालय अर्थात मंत्रालयामध्येसुद्धा दर दिवशी विविध कारणांनी येणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी असते. मात्र आता याच मंत्रालयात येण्यासाठीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील नियम बदलण्यात आले आहेत. (Digi EPaass For Maantralay Entry)
राज्याच्या कानाकोपऱ्यातून जिथं आमदार, खासदार, नेतेमंडळी आणि विविध नेत्याच्या, मंत्र्यांच्या सचिवांना भेटण्यासाठी गर्दी होते, काही महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा घेण्यापासून ते अगदी मदतीची हाक देईपर्यंत नागरिकांना खुणावणाऱ्या या मंत्रालात येण्यासाठी आता नव्यानं ऑनलाईन पासवर आधारित एक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. ‘डिजी प्रवेश पास’ असं या प्रवेश प्रणालीचं नाव असून, या पासशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
कधीपासून लागू होणार नवी प्रवेश प्रक्रिया?
डिजीप्रवेश या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून दिल्या जाणाऱ्या पासच्या माध्यमातून मंत्रालयात प्रवेश दिला जाणार असून, 15 ऑगस्टपासून ही नवी प्रणाली लागू केली जाणार आहे. या पाससाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड अशी शासकीय मान्यता असणारं कोणतंही कागदपत्र पुरावा स्वरुपात सादर करावं लागणार आहे.
स्मार्टफोन नाही त्यांना कसा मिळणार पास?
मंत्रालयाच्या दिशेनं येणाऱ्या कैक मंडळींमध्ये काही वयोवृद्ध किंवा काही अशीही मंडळी असतात ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत. अशा सर्वांसाठी ‘गार्डन गेट’ इथं मंत्रालयातील प्रवेशाकरता नोंदणी करण्यासाठीची मगत खिडकी सुरू केली जाणार आहे. जिथं ऑनलाईन अॅपद्वारे या नागरिकांना पास दिला जाईल. महाराष्ट्राच्या गृहविभागानं 11 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले. तत्पूर्वी प्रत्यक्ष स्वरुपात पास देण्याची पद्धत थांबवली आहे.
Digi Pravesh वर नोंदणी कशी करावी?
‘डिजीप्रवेश’ हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीसाठी उपलब्ध राहणार असून, Digi Pravesh असं सर्च केल्यास ते, विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. अॅपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित यंत्रणेतून Photo ची ओळख पटवत ज्या विभागात काम आहे तिथं थेट स्टॉल बुक करत रांग न लावता प्रवेश मिळवता येईल. साधारण तीन मिनिटांहून कमी वेळात ही प्रक्रिया होणार असल्याचा दाव करण्यात येत असल्यामुळं मंत्रालयातील प्रवेशासाठी सामान्यांना जास्त वेळ दवडावा लागणार नाही.
मुंबईतील मंत्रालयात प्रवेशासाठी नवीन नियम काय आहेत?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या मंत्रालयात प्रवेशासाठी आता ‘डिजी प्रवेश पास’ ही ऑनलाइन प्रवेश प्रणाली लागू करण्यात येत आहे. या पासशिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही.
डिजी प्रवेश पास मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पास मिळवण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी कोणतेही शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र सादर करावे लागेल.
ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांना पास कसा मिळेल?
स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींसाठी मंत्रालयाच्या ‘गार्डन गेट’ येथे नोंदणी खिडकी उपलब्ध असेल. तिथे ऑनलाइन अॅपद्वारे पास दिला जाईल.