तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर शहरातून विमानसेवा सुरु झाली आहे. शहरातील होटगी विमानतळावरुन आजपासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर अशी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानसेवेचे उद्घाटन करण्यात आले.
आठवड्यातून चार दिवस ही सेवा सध्या देण्यात येणार आहे. सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी Fly91 या विमान कंपनीद्वारे सेवा पुरवण्यात येणार आहे. सध्या या विमानप्रवासाचे तिकीटदर साडेतीन हजार रुपयांच्या जवळपास असून मागणीनूसार यात बदल होऊ शकतो. लवकरच सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यातील विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
सोमवार आणि शुक्रवार –
- गोवा – सोलापूर : सकाळी ७.२० (प्रस्थान), सकाळी ८.३० (आगमन)
- सोलापूर – गोवा : सकाळी ८.५० (प्रस्थान), सकाळी १०.०५ (आगमन)
शनिवार आणि रविवार :
- गोवा – सोलापूर : दुपारी ४.०५ (प्रस्थान), सायंकाळी ५.१० (आगमन)
- सोलापूर – गोवा : सायंकाळी ५.३५ (प्रस्थान), सायंकाळी ६.५० (आगमन)