१९ वर्षीय यशराज चव्हाणचा अपघातात झाला होता मृत्यू
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
धाराशिव : तेरखेडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर स्कुटीला धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा आणि चालकाचा अखेर शोध लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व येरमाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत अशोक लेलँड टेम्पोसह २२ वर्षीय चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातात भूम येथील १९ वर्षीय यशराज श्रीकृष्ण चव्हाण याचा मृत्यू झाला होता.
यशराज चव्हाण (वय १९, रा. लक्ष्मीनगर, भूम) हा २९ सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एमएच २५ बीएच ५५८१ क्रमांकाच्या स्कुटीवरून जात होता. तेरखेडा येथे वनविभागाच्या जागेसमोरील एनएच-५२ वर अज्ञात वाहनाने त्याच्या स्कुटीला समोरून धडक दिली. या अपघातात यशराज गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक जखमीला उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून निघून गेला होता.
याप्रकरणी यशराजचे वडील श्रीकृष्ण रामलिंग चव्हाण (वय ४२) यांच्या फिर्यादीवरून ३० सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान येरमाळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून अपघातातील वाहन राजेशनगर, ढोकी परिसरातील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत शुभम अच्युत काळे (वय २२, रा. राजेशनगर, ढोकी) याला एमएच ४७ वाय ३४२५ क्रमांकाच्या अशोक लेलँड टेम्पोसह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी त्याला येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, यशवंत घोडके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व येरमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.



