अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली अहिल्यानगर-बीड रेल्वे एकदाची सुरू होत असून, मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी 17 सप्टेंबर रोजी यामार्गावरील पहिली रेल्वेगाडी बीड येथून अहिल्यानगरकडे प्रस्थान करील.(Beed – Ahilyanagar Railway)
या गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वेमार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिल्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की बीड ते परळी वैजनाथ रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी.
या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. अर्थसंकल्पात मंजूर 150 कोटी रुपये देण्यात यावेत. उर्वरित 150 कोटी रुपयांची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.
असा आहे अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग
रेल्वेमार्गाची एकूण लांबी – 261.25 किलोमीटर
जमिनीचे एकूण भूसंपादन – 1822.168 हेक्टर
रेल्वेखालील एकूण पूल – 130
रेल्वेवरील पूल – 65
मोठ्या पुलांची संख्या – 65
छोटे पूल – 302
द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत – 4805.17 कोटी
केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा – 2402.59 कोटी