माजी आमदार राहुल मोटे यांनी मानले सरकारचे आभार
तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार
भूम : परंडा विधानसभा मतदारसंघातील भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल माजी आमदार राहुल मोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.
परंडा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पंचनामे करून परंडा मतदारसंघासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राहुल मोटे यांनी ३ सप्टेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
त्यानंतर मोटे यांनी ५ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील बावची, १३ सप्टेंबर रोजी भूम तालुक्यातील वांगी (बु.) आणि १८ सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली होती. यावेळी पिकांची सद्यस्थिती आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी दुष्काळाची तीव्रता शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भातील छायाचित्रे व व्हिडिओही संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आता भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, यासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनी सांगितले.




