मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाला गळती लागली आहे. लोकसभा निवडणुकीत १० जागा लढवत शरद पवारांनी ८ जागांवर विजय मिळवला होता. त्यांच्या विजयाचा स्ट्राईक रेट तब्बल ८० टक्के इतका होता. लोकसभेत केलेल्या उत्तुंग कामगिरीनंतर विधानसभेतही शरद पवार गटाला चांगलं यश मिळेल असं म्हटलं जात होतं. मात्र तसं झालं नाही. विधानसभेला शरद पवार गट सपशेल बॅकफुटला गेला. यानंतर पवार गटाला गळती लागायला सुरुवात झाली.(babajani durrani left ncp sharad pawar)
पवारांचे कट्टर समर्थक मोटे यांचा अजित पवार गटात प्रवेश
मागील २४ तासांत शरद पवारांना दोन मोठे धक्के बसले आहेत. शरद पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राहुल मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. राहुल मोटे हे भूम परंडा मतदारसंघातून दोन टर्मचे आमदार आहेत. कट्टर समर्थक असलेल्या मोटे यांनी शरद पवारांची साथ सोडल्याने धाराशिवमध्ये शरद पवार गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
तीन टर्मचे आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर
ही घटना ताजी असताना आता शरद पवार गटाबाबत आणखी एक धक्का देणारी घटना समोर आली आहे. शरद पवार गटाचे तीन टर्मचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पवारांचा साथ सोडायचा निर्णय घेतला आहे. ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. येत्या ७ ऑगस्टला ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत. दुर्राणी हे देखील शरद पवार गटाचे समर्थक मानले जातात. पवारांनी त्यांना २०१२ आणि २०१८ साली सलग दोन वेळा विधान परिषदेवर संधी दिली होती. पण पक्षफुटीनंतर दुराणी अजित पवारांसोबत गेले. पण लोकसभेच्या काळात ते पुन्हा शरद पवारांकडे आले. आता हेच बाबाजानी दुर्राणी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.