जायकवाडी धरणाचा पाणी साठा आज ९५.२१ टक्क्यांवर पोहोचला असून सध्या आवक केवळ ९७६ क्युसेक इतकी आहे. धरणातील साठा ९८ टक्क्यांवर गेल्यानंतरच मुख्य दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, तोही आवक बघून, असे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी स्पष्ट केले.(Jayakwadi dam 95.21 percent full)
मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर ३१ जुलै रोजी धरणातील मुख्य गेट्स उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मात्र, नंतर वरील भागातून आवक घटल्याने विसर्ग थांबवण्यात आला होता. सध्या मागील तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात आणि वरील भागात पुन्हा पावसामुळे आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाचा साठा वाढून आज ९५.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिकसह वरील धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी धरण अल्पावधीत भरले. याच कालावधीत १५ दिवसांपूर्वी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र सध्या आवक कमी झाल्याने विसर्ग थांबवण्यात आला आहे. धरणात ९८ टक्के साठा पूर्ण झाल्यानंतरच विसर्ग पुन्हा सुरू केला जाणार असून, तोही सध्याच्या आवक आणि परिस्थिती लक्षात घेऊनच केला जाईल, असे शाखा अभियंता मंगेश शेलार आणि गणेश खराडकर यांनी सांगितले. त्यामुळे जायकवाडी परिसरातील नागरिकांसह खालील गावांनी पाणी सोडण्याच्या निर्णयासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.