धाराशिव : सोशल मिडीयावर हटके मार्केटिंगमळे प्रसिद्ध झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्री बाहेर लावलेले बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे समोर आले आहे. याबाबत हॉटेलच्या मालकांनी स्वतः व्हिडीओ बनवुन माहिती दिली आहे.
रविवारी (९ जून) रोजी काही कारणास्तव हॉटेल बंद होते. आज हॉटेलवर आल्यानंतर मालकाला बाहेर लावलेले बॅनर फाडल्याचे आढळून आले. हॉटेलचे नाव असलेला बोर्ड देखील दगड मारुन फाडल्याचे दिसत आहे. हा प्रकार व्यावसायिक स्पर्धेतून करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
“आपल्यावर जळणाऱ्यांनी दगडं मारुन बॅनर फाडले आहे. बरोबरीने धंदा करुन दाखवा, अशा प्रकारे नुकसान करुन ४-५ माणसं पाठवून खोड्या करु नका”, अशा शब्दात हॉटेलच्या मालकाने आपल्या भावना व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी याच हॉटेलच्या मालकाने फॉर्च्यूनर कार विकत घेतल्याने सोशल मिडीयावर त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात येत होते. सर्वसामान्य कुटुंबातील एका तरुणाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मिडीयावर जाहिरात करुन त्याचा व्यवसाय वाढवल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला होता.