भगवान गौतम बुद्धांच्या दहा फूट उंच मूर्तीचे लोकार्पण
औसा : तालुक्यातील ऐतिहासिक खरोसा बुद्ध लेणी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन व भगवान गौतम बुद्धांच्या दहा फूट उंच मूर्तीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यास बौद्ध धम्म अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
पूज्य भिक्खू महाविरो थेरो (काळेगाव) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या धम्म परिषदेचे उद्घाटन भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते मल्हार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला दिलेला शांती, करुणा, प्रज्ञा, समता आणि बंधुतेचा संदेश तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या धम्म परिषदेला विशेष महत्त्व होते.
याप्रसंगी पूज्य भिक्खू धम्मसार थेरो (किल्लारी), पूज्य भिक्खू सुमंगल थेरो (कराळी), पूज्य भिक्खू धम्मबोधी (पानगाव), पूज्य भंते राहुल (काळेगाव), पूज्य भंते सोनुत्तर (काळेगाव) यांच्यासह पूज्य भिक्खू संघ, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि बौद्ध धम्म अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

