आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मानले आभार!
ढोकी : खरीप हंगाम २०२० मधील प्रलंबित पीकविमा भरपाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीकविमा भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयाचे स्वागत करत ढोकी येथील शेतकरी बांधव व नागरिकांनी एकत्र येत पेढे वाटून जल्लोष केला. तसेच या पीकविम्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आभार मानले.
खरीप २०२० मधील पीक नुकसानीची विमा भरपाई मिळावी, यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या हक्काच्या पीकविमा भरपाईचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत ढोकी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रयत्नांबद्दल विशेष आभार मानले. पीकविमा भरपाईच्या प्रश्नासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना न्यायालयीन निर्णयामुळे सकारात्मक दिशा मिळाल्याचे समाधान यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या आनंदोत्सवात ढोकी येथील शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


