भाविकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी थेट दर्शनाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत थेट दर्शन घडवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या अनधिकृत व्यक्तींपासून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आई श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात येतात. याच भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही अनधिकृत व्यक्ती थेट दर्शन घडवून देण्याचे आमिष दाखवत पैशांची मागणी करू शकतात. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी मंदिर संस्थानने भाविकांना सतर्क केले आहे.
आई श्री तुळजाभवानी देवीचे धर्मदर्शन आणि मुखदर्शन पूर्णतः मोफत असून, त्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पैसे देण्याची आवश्यकता नाही. तसेच देणगी दर्शन पास घ्यायचा असल्यास भाविकांनी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या अधिकृत काउंटरवरूनच पास खरेदी करावा. अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांमार्फत दर्शन पास घेण्याचे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
थेट दर्शन घडवून देण्याच्या नावाखाली कोणतीही व्यक्ती पैशांची मागणी करत असल्यास भाविकांनी पैसे देऊ नयेत. अशा प्रकाराची माहिती तत्काळ मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात किंवा मंदिर पोलिस चौकीत देऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






