हरवलेली पर्स महिला भाविकाला परत
तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची हरवलेली पर्स सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत मिळाली. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे भाविकांकडून कौतुक होत आहे.
बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांना एक बेवारस पर्स आढळून आली. त्यांनी तत्परता दाखवत ही पर्स दर्शन मंडपातील नियंत्रण कक्षात जमा केली. या पर्समध्ये २ हजार ५२० रुपये रोख रक्कम आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती.
दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पुणे येथील महिला भाविक निशा रोहित काळे या पर्स हरवल्याची तक्रार घेऊन नियंत्रण कक्षात पोहोचल्या. त्यानंतर पर्समधील वस्तूंची खातरजमा करून संबंधित पर्स त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम पुन्हा मिळाल्याने महिला भाविकांना दिलासा मिळाला.
यावेळी सुरक्षा रक्षक बाळकृष्ण रामेश्वर सोनार यांच्यासह विष्णू गायकवाड, सागर सोनवणे, विष्णू कोळी आणि इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षा रक्षकाच्या कर्तव्यदक्षतेमुळे भाविकांचा मंदिर प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणारी ही घटना ठरली.





