आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनातून विकासकामांना गती
धाराशिव : धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील दत्त कॉलनी परिसरातील रस्त्याच्या विकासकामाला अखेर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कदम पिठाची गिरणी ते काकडे घर या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन सोमवारी, (दि. १६ नोव्हेंबर) करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नांतून या विकासकामासाठी ९० लाख २७ हजार ५९० रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती प्रवीण माळी यांनी दिली.
माळी यांनी नारळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला धाराशिव नगर परिषदेच्या अध्यक्षा नेहा काकडे, नगरसेवक राहुल काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
धाराशिव शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक पाचमध्ये हे काम हाती घेण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना ये-जा करणे अधिक सुलभ होईल. माळी यांच्या पुढाकारातून या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
प्रभागातील नागरिकांना चांगले रस्ते आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या रस्त्याच्या कामामुळे दत्त कॉलनी परिसराच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



