जपान आणि मलेशियाच्या खेळाडूंना पराभूत करत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी
धाराशिवचा गौरव वाढविला
धाराशिव : जागतिक क्रीडा क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक वाढविणारी अभिमानास्पद कामगिरी दारफळ (ता. धाराशिव) येथील कु. आराध्या पांचाळ हिने केली आहे. 3rd World Thaiboxing Championship 2026 या जागतिक थायबॉक्सिंग स्पर्धेत आराध्याने जपान आणि मलेशिया येथील खेळाडूंना पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशामुळे दारफळ गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत आराध्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपल्या क्रीडाकौशल्याची छाप पाडली. जपान आणि मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्यांना मात देत सुवर्णपदक मिळविणे ही तिच्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीची पावती मानली जात आहे.
आराध्याच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमधून तिचे अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील खेळाडूंनाही जागतिक स्तरावर यश मिळविण्याची प्रेरणा मिळाली आहे. तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील क्रीडा वाटचालीसाठी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



