जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड
तुळजापूर : तुळजापूरची युवा टेनिसपटू प्रियंका हंगरगेकर हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. चीनमधील जिंगशान येथे होणाऱ्या जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपसाठी तिची भारतीय संघात निवड झाली आहे. २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रियंका भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
प्रियंकाने यापूर्वी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सातत्यपूर्ण मेहनत आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर तिने भारतीय संघात स्थान मिळवले. तिच्या या निवडीमुळे तुळजापूरसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये असलेल्या गुणवत्तेला योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते जागतिक स्तरावरही आपली छाप उमटवू शकतात, हे प्रियंकाच्या यशातून अधोरेखित झाले आहे.
तुळजापूरमधून थेट जागतिक स्पर्धेपर्यंतचा तिचा प्रवास जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
चीनमध्ये होणाऱ्या जागतिक ज्युनियर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये प्रियंकाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून, तिच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.




