जिल्हाधिकाऱ्यांकडून पार्किंग, दर्शन व्यवस्था व विविध व्यवस्थांची पाहणी
तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा ११ ऑक्टोबरपासून सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी केलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी व श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी पुजार यांनी शहरातील घाटशिळ पार्किंग, हडको मैदान, अग्निशामक पार्किंगसह धाराशिव रोड, लातूर रोड आणि नळदुर्ग रोडवरील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. तसेच मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्थेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून नियोजनाची माहिती घेतली.
या नंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी पुजार यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सवाच्या तयारीबाबत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यामध्ये सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, विद्युत व्यवस्था तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.
या वेळी पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार व प्रशासन व्यवस्थापक माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक प्रशासन व्यवस्थापक नागेश शितोळे, सहाय्यक व्यवस्थापक जयसिंग पाटील यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.



