आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. यासाठी संस्थानच्या उपलब्ध निधी, नियम व अधिकारक्षेत्राचा विचार करून सर्वंकष मदत आराखडा तयार करावा, अशा सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना पत्राद्वारे केल्या आहेत.
जिल्ह्यात यंदा अल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, पशुधनासाठी चारा व पाणी तसेच शेतकरी व इतर ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे आ. पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकारने धाराशिवसह दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सामाजिक व धार्मिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना संस्थानच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत देता येईल, याचा विचार करावा. संस्थानकडे उपलब्ध निधी, नियम आणि अधिकारक्षेत्र लक्षात घेऊन आवश्यक मदत अथवा दिलासा देण्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने मदत व पुनर्वसनाच्या उपाययोजनांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वपरवानगी घेऊन मान्यता देता येऊ शकते. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त जनतेला मदत करण्यासाठी सर्वकष आराखडा तयार करून, सदर आराखडा निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यास लगेच अथवा न दिल्यास आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असेही पत्रात म्हटले आहे.
दुष्काळाच्या या अभूतपूर्व परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, याला प्राधान्य देऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.



