मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज शुक्रवारी मिळाली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी त्वरित अॅक्शन मोडमध्ये येत मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे. त्याचबरोबर परिसरात सर्च ऑपरेशन देखील करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजून तरी कोर्ट परिसरात सशंयस्पद असं काही आढळून आलेलं नाही. यापूर्वी देखील मुंबई उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी आली होती.(Bomb Threat to Bombay High court)
मात्र या धमकीनंतर उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय उडवून देण्याची ही दुसरी धमकी आहे. यापूर्वी १२ सप्टेंबर रोजी देखील मुंबई उच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा परिसर त्वरित रिकामा करण्यात आला होता. ही धमकी न्यायालयाच्या अधिकृत इमेल अकाऊंटवर देण्यात आली होती. यानंतर कोर्टातील त्या दिवसाच्या सर्व सुनावणी सस्पेंड करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी देखील लगेच सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं. बॉम्ब शोधक आणि निकामी करणारं पथक देखील पाचारण करण्यात आलं. मात्र पोलिसांना संशयास्पद असं काही आढळून आलं नाही.









