शारदीय नवरात्रोत्सव अवघ्या १० दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. दरम्यान, तुळजाभवानी देवीच्या व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किंमतीत वाढ करण्यात आलीय. व्हीआयपी दर्शन पासच्या दरात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिली आहे. व्हीआयपी पासचे नवे दर २० सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहेत. ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी ही दरवाढ झाल्याने भाविकांना व्हीआयपी दर्शनासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.(Tulja Bhavani Darshan VIP Pass Rates Increased)
असे असतील व्हीआयपी पासचे नवे दर
तुळजाभवानी मंदिर संस्थानाने एक परिपत्रक काढून या दरवाढीची अधिकृत घोषणा केली आहे. देणगी दर्शन पास आणि स्पेशल गेस्ट रेफरल पासच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. याआधी देणगी दर्शन पास २०० रुपयांना मिळत असे. यापुढे हा देणगी दर्शन पास ३०० रुपयांना मिळणार आहे. तर ५०० रुपयांना मिळणाऱ्या देणगी दर्शन पासची किंमत थेट दुप्पट केली असून तो १ हजार रुपयांना मिळणार आहे. स्पेशल गेस्ट रेफरल पास हा महत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेला पास आहे. तो याआधी २०० रुपयांना होता. पण आता त्यासाठी ५०० रुपये आकारले जातील.








