येत्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. गणेश उत्सवादरम्यान आनंदाचे व भक्तिमय वातावरण राहणार असून गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना तसेच भाविकांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी आतापासूनच नियोजन करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित विभागांना दिले.(Dharashiv Collector, SP take review for ganeshotsav)
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी बुधवारी दि.२० ऑगस्ट रोजी धाराशिव शहरातील गणेश स्थापना व विसर्जन मार्गाची पाहणी केली. तसेच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणाऱ्या हातलाई देवी मंदिर परिसरातील तलाव व श्री विसर्जन विहिरीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, पोलीस उपअधीक्षक सुरेशकुमार राऊत, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पोलीस निरीक्षक कुमार दराडे व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता अधिका-यांनी घावी
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पुजार म्हणाले, विविध गणेश मंडळाकडून ज्या ज्या ठिकाणी गणरायाची स्थापना होणार आहे, त्या ठिकाणी गणेश मंडळाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. गणरायाची स्थापना होणाऱ्या ठिकाणी स्वच्छता असावी. गणेश मंडळांना व मिरवणुकीला अडथळा येणारे व अतिक्रमण केलेले असल्यास ते तातडीने हटविण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही व रस्त्यांमध्ये अडथळा येणार नाही याकडे लक्ष द्यावे. गणेश मंडळांनी पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी. वीज वितरण विभागाने विद्युत तारा या व्यवस्थित असल्याची खात्री करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी. अशा विविध सूचना जिल्हाधिकारी पूजार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.