सोमनाथ सूर्यवंशी मृ्त्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्वपूर्ण ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. (supreme court on somnath suryawnshi)
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सुप्रीम कोर्टात गेले होते. उच्च न्यायालयाचे आदेश सुप्रीम कोर्टाने कायम ठेवले आहेत.
विजयबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील त्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या खटल्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले असून, हा निकाल न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असल्याचे बोलले जात आहे. या केसमध्ये पीडित सुर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे, ॲड. कीर्ती आनंद यांनी बाजू मांडली.