धाराशिवच्या तुळजाभवानी ज्येष्ठ नागरिक ग्रुप व धाराशिव पर्यटन समितीच्या सहकार्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक अशोक चव्हाण यांनी हिमालय पर्वतरांगांवर चढाई करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही साहस आणि तंदुरुस्तीचा अद्वितीय आदर्श घालून देत त्यांनी धाराशिवचे नाव हिमालयाच्या उंच शिखरावर पोहोचवले आहे. (Dharashiv,s man has scaled the Himalayan peak)
युथ होस्टल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. उत्तराखंडातील कठीण ट्रेकिंग मार्गावर त्यांनी आपल्या मित्रासह यशस्वी पाऊल टाकले. ६,००० फूट उंचीवरील गोविंद घाट येथून ट्रेकची सुरुवात झाली. तेथून १५ किमी पायी प्रवास करून त्यांनी १०,००० फूट उंचीवरील घांगरिया गाठले. त्यानंतर १२ किमीचा थरारक प्रवास करत १२,४०० फूट उंचीवरील ‘व्हॅली
ऑफ फ्लॉवर्स’ या निसर्गरम्य प्रदेशाचा आनंद लुटला. अखेरीस पावसाळ्यातील कठीण हवामान, उणे ३ अंश तापमान आणि धोकादायक वाटा पार करत त्यांनी १४,६०० फूट उंचीवरील हेमकुंड हे पवित्र स्थळ गाठले.
या अद्भुत प्रवासानंतर त्यांनी बद्रीनाथ, भारताचे पहिले गाव मानागाव, प्रसिद्ध वसुंधरा धबधबा तसेच अनेक आध्यात्मिक आणि पौराणिक स्थळांची पायी भटकंती केली. उत्तराखंड दर्शनाच्या निमित्ताने त्यांनी नैनितालजवळील सात तलावांचा समूह ‘सातताल’ ही पाहिला. पौराणिक कथांनी नटलेले भीमताल, गरुडताल, कमळताल, इतर नवकुचियाताल आणि सरोवरांच्या कथा ऐकून त्यांनी त्या प्रदेशाचा इतिहासही आत्मसात केला. १५ दिवसांच्या या अविस्म रणीय मोहिमेत त्यांनी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, हेमकुंड साहेब, बद्रीनाथ, स्वर्गारोहिणी, गोलू देवता मंदिर, कैंची धाम (नीम करोली बाबा), हनुमान गडी, गरुडगंगा अशा विविध स्थळांना भेट देत अध्यात्म आणि निसर्ग यांचा अनोखा संगम अनुभवला.
ज्येष्ठ नागरिक असूनही अशोक चव्हाण यांनी दाखवलेली जिद्द, शारीरिक क्षमता आणि निसर्गप्रेम हे खरंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे धाराशिवचे नाव हिमालयाच्या शिखरावर झळकले असून, जिल्ह्यातील पर्यटक व साहसप्रेमींना दिशा नवी मिळाली आहे.