पुढील आवर्तनात पाणी सोडण्यास जलसंपदामंत्र्यांची मान्यता : आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव : जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करण्याची आपली मागणी मान्य केली. आता उजनीतून होणाऱ्या पुढील पाण्याच्या आवर्तनात हे पाणी देण्यास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीत या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले ही मोठी समाधानाची बाब असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उजनी धरणातून एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण केली होती. हे पाणी घाटणे बॅरेजमधून रामदरा, पांगरदरवाडी आणि सिंदफळ येथील तलावांमध्ये सोडण्याबाबत आपण रीतसर प्रस्तावही सादर केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीची दखल घेऊन आवश्यक कार्यवाहीस मान्यता दिली. त्यानंतर पाणी उपलब्ध होण्यातील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण तातडीने पाठपुरावा केला. त्यानुसार रीतसर प्रस्ताव कृष्णा मराठवाडा पाटबंधारे मंडळाकडे पाठविण्यात आला. मंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो मान्यतेसाठी जलसंपदामंत्र्यांकडे पाठविण्यात आला होता. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आपण भेट घेतली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. उजनीतून एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आपण त्यांच्याकडेही केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विखे पाटील यांनी पुढील आवर्तनात एक टीएमसी पाणी धाराशिवला देण्यास मान्यता दिली आहे. घाटणे ते रामदरा या मार्गावरील योजनेची चाचणी करून १ टीएमसी पाणी धाराशिव जिल्ह्यात पिण्यासाठी साठवण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
गरज पडल्यास अतिरिक्त पाणीही मिळणार
जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता भविष्यात अधिक पाण्याची गरज भासल्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याबाबतही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणखी महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरूच राहील. जिल्ह्याच्या पाणीप्रश्नावर आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शक्य झाले
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री जिल्ह्यात आले असताना उजनी धरणातून धाराशिवसाठी पिण्याकरिता १ टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी आपण केली होती. मागणीची दखल घेत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पाणी आरक्षित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी भरीव निधीही उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण झाली आणि आज उजनीतून धाराशिवला पाणी आणण्याचा मार्ग मोकळा झाला. धाराशिवच्या जनतेला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली तातडीची भूमिका आणि भक्कम पाठबळामुळेच उजनीचे पाणी जिल्ह्यात दाखल होत आहे.






