राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ललित कला पुरस्कार प्रदान
तुळजापूर : तुळजापूरच्या मातीत घडलेले चित्रकार सिद्धार्थ शिंगाडे यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या ललित कला अकादमीच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय ललित कला पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तुळजापूर नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये शिक्षण घेतलेल्या सिद्धार्थ शिंगाडे यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आपल्या कलासाधनेच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले असून, त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सिद्धार्थ शिंगाडे यांच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या कलाक्षेत्राच्या लौकिकात भर पडली असून, त्यांच्या पुढील कलाप्रवासासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.




