नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यातील स्वागत सोहळ्यातील एक क्षण विशेष चर्चेचा ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी एकाच गाडीतून काल प्रवास केला. यावेळी त्यांनी वापरलेली गाडी ही महाराष्ट्रात नोंदणी झालेली फॉर्च्युनर कार असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी दिल्लीतील पालम एअरपोर्टवर दाखल झाले तेव्हा पंतप्रधान मोदी स्वतः विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत करताना दिसले. भारत-रशिया २३व्या वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत असल्याने संरक्षण, ऊर्जा, व्यापार आणि जागतिक घडामोडींवर उच्चस्तरीय चर्चा होणार असल्याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
पालम एअरपोर्टवरून पीएम मोदी आणि पुतिन ज्या पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनर कारमधून रवाना झाले, त्या गाडीची नंबर प्लेट MH 01 EN 5795 अशी असून ती महाराष्ट्र, विशेषतः मुंबई पासिंगची आहे. राजधानी दिल्लीत अशा उच्चस्तरीय सुरक्षात्मक हालचालीसाठी महाराष्ट्र नोंदणीची गाडी वापरल्याने अनेक अंदाज वर्तवले जात आहेत.
राष्ट्राध्यक्ष पुतिन सामान्यतः अत्याधुनिक बुलेटप्रूफ लिमोझीन ‘Aurus Senat’ मध्ये प्रवास करतात. मात्र यावेळी साध्या दिसणाऱ्या पण उच्च सुरक्षा क्षमतेच्या फॉर्च्युनरचा वापर करण्यात आला. दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास करण्याचा निर्णय हा वैयक्तिक स्नेह, परस्पर विश्वास आणि भारत-रशिया संबंधांची जवळीक दर्शवणारा प्रतीकात्मक कूटनीतिक संदेश मानला जात आहे.









