नव्या कचरा डेपोसाठी २५ एकर जागेचा प्रस्ताव
जिल्हाधिकारी सकारात्मक असल्याची मुख्याधिकाऱ्यांची माहिती
धाराशिव : ‘धाराशिव शहरासाठी कचरा डेपोला 25 एकर जागा देण्याबाबत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची सकारात्मक भूमिका आहे. आम्ही गायरान जागेची मागणी केली असून, त्याबाबतची कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाली आहे. जमिनीची मोजणी झाली की ही जमीन मिळेल याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी लवकरच देतील,’ अशी माहिती धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत लातूरमधील अधिकारी कांबळे यांना सध्याच्या कचरा डेपोची पाहणी करण्यास पाठवण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सध्याच्या कचरा डेपोची पाहणी त्यांनी केली. या वेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे उपस्थित होत्या. परिसरातील नागरिकही पाहणीवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान परिसरातील संतप्त नागरिक आणि महिलांनी कचरा डेपोमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. दुर्गंधी, अस्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. कचरा डेपोच्या स्थलांतरासाठी ठोस कार्यवाही कधी होणार, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला. यावेळी मुख्याधिकारी अंधारे यांनी कचरा डेपो स्थलांतराबाबत नगर परिषद प्रशासन सकारात्मक असून, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पुढे नेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, कचरा डेपोच्या स्थलांतरासाठी प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष जागा उपलब्ध होऊन स्थलांतराची प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मृत जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
यावेळी सध्या जिथे कचरा टाकला जातो त्या रस्त्याकडेला मृत जनावरेही टाकली जात असल्याने दुर्गंधी सुटते व शालेय विद्यार्थी आजारी पडतात हा मुद्दा नागरिकांनी आक्रमकपणे मांडला. अनेकदा तक्रारी करूनही कारवाई न झाल्याची प्रतिक्रिया यावेळी संतप्त नागरिकांनी दिली.
यावर मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी मृत जनावरे टाकत नसल्याचे स्पष्ट केले. मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा प्रश्नही महत्त्वाचा असून, त्यासाठी जनावरांची विद्युतदाहिनी उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक विशेष निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही अंधारे यांनी दिली.



