चिंचपूर (ढगे) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद
वीज, रोजगार, अतिवृष्टी अनुदान आणि सामाजिक सुरक्षा पेन्शनसाठी ग्रामस्थांनी मांडल्या मागण्या
धाराशिव : आभाळाने साथ सोडली, शेतातील पिके संकटात सापडली आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला, तरी बळीराजाने आशा सोडू नये. दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी,शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबे एकटी नाहीत. त्यांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभे आहे. ग्रामीण भागात रोजगार व उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे, जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणे आणि पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केला.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), तुळजापूर कॅम्पसच्या वतीने अतिवृष्टी व कोरडा दुष्काळ संशोधन प्रकल्पांतर्गत भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथे शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणी, शेतीतील नुकसान, शेतकऱ्यांच्या मनातील चिंता, महिलांच्या उपजीविकेचे प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि शाश्वत शेतीच्या उपाययोजना यांवर या वेळी ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला.विशेष म्हणजे, केवळ सभागृहातील चर्चेपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता संशोधन प्रकल्पाच्या पथकाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण कुटुंबांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांनी रोजगार व उपजीविकेशी संबंधित विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्यांचा लाभ घ्यावा. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुष्काळाच्या काळात पशुधनाचे संरक्षण, चारा-पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याला विशेष महत्त्व आहे.
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेल्या असल्याने शेतकऱ्यांसोबतच शेतमजूर व कष्टकरी कुटुंबांच्या अडचणींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. संकटाच्या काळात शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या उपजीविकेला आधार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संवाद कार्यक्रमात चिंचपूर (ढगे) येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतीसाठी पुरेशा दाबाने वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात आणि सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी पात्र शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.
जिल्हा प्रशासन, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, सामाजिक संघटना आणि स्थानिक समुदाय यांच्या समन्वयातून शेतकरी व कष्टकरी कुटुंबांपर्यंत शासकीय योजनांची माहिती, आवश्यक मार्गदर्शन आणि मानसिक आधार पोहोचविण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि संकटाच्या काळात त्यांना मानसिक बळ देणे,हा या उपक्रमाचा विशेष पैलू ठरला.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रा. बाळ राक्षसे, उपविभागीय अधिकारी श्रीमती चव्हाण,जल व भूमी तज्ज्ञ डॉ.नितीन पाटील, प्रकल्प समन्वयक गणेश चादरे, प्रकल्प सदस्य नितीश कुमार, सतीश तांबे, तहसीलदार जयवंत पाटील,गटविकास अधिकारी, सरपंच तसेच शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


