मराठवाड्याला दुष्काळापासून कायमचं मुक्त करण्याचं काम सरकार करून दाखवेल. कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्यापर्यंत आणलं. दुसऱ्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी उजनी पर्यंत आणून मराठवाड्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या बरोबरच उल्हास खोऱ्याचं ५४ टीएसी पाणी मराठवाड्यापर्यंत आणलं जाईल. आणि मराठवाड्यातला दुष्काळ हा लवकरच भूतकाळ होणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या भाषणात केले.(CM fadanvis on marathwada draught)
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाच्या भाषणात ते बोलत होते. गोदावरी नदी खोऱ्यातील पाण्याची तुट भरून काढण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. येत्या काळात मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम सरकार करणार आहे.
सांगली आणि कोल्हापूरचं पुराचं पाणी मराठवाड्यापर्यंत आणण्याच्या प्रकल्पाला गती
कृष्णा खोऱ्याचं पाणी सांगली आणि कोल्हापूरचं पाणी मराठवाड्यात आणण्या संदर्भात काही दिवसांपूर्वीच व्यवहार्यता अहवाल प्राप्त झाला होता आणि हा व्यवहार्यता अहवाल सकारत्मक असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार तथा मित्र चे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली होती.
यासंदर्भात आमदार पाटील आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात बैठक झाली होती. दरम्यान हे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या या प्रकल्पाबाबत उल्लेख करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की याचा डीपीआर बनवून याच्या निविदा प्रक्रिया येत्या जानेवारी,फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी भाषणातून दिली. परिणामी आता मराठवाड्यात हे पाणी आणण्याच्या प्रकल्पाला अधिक गती मिळणार आहे.









