आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना केंद्र व राज्य शासनांतर्गत असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून दीर्घकालीन मदत मिळवून देण्यासाठी काम सुरू केले आहे. ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्याचे केवळ शासकीय अनुदानावर अवलंबून राहून भागणार नाही. शासनाच्या योजनांसोबत आपणही मदतीसाठी मोठा हातभार लावला पाहिजे. ‘मित्र’ या शासकीय संस्थेच्या माध्यमातून ‘क्राउड फंडिंग’ उभारून अतिबाधित कुटुंबांना थेट मदत पोहोचवण्याचे सकारात्मक काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.(MLA Ranajagjitsinha patil)
भूम व परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, फळबागा आणि पशुधनाचे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बाधित कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अनेक कुटुंबांच्या शेतीजमिनी खरवडून गेल्या, फळबागा पूर्णपणे नष्ट झाल्या तर त्यांच्याकडे असलेल्या सर्व जनावरांचा बळी गेला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदारांना अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अशा कुटुंबांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आमदार पाटील म्हणाले की, “अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. जमिनी खरवडून गेल्या, फळबागा कोसळल्या, पशुधन वाहून गेले. अशा परिस्थितीत या कुटुंबांना पुन्हा उभं करण्यासाठी शासनासोबत आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण या कुटुंबांच्या पाठीशी आहे आणि त्या सर्वांपर्यंत शासनाच्या योजना तसेच समाजाची मदत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.”
शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासकीय यंत्रणा,लोकप्रतिनिधी आणि समाजातील दानशूर संघटना, व्यावसायिक व व्यक्ती यांनी हातात हात घालून पुढाकार घेण्याचे आवाहनही आमदार पाटील यांनी केले. त्यामुळे भूम व परंडा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळण्यासोबतच भविष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.








