जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भूम तालुक्यातील साडेसांगवी येथे पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचे कीट, शालेय साहित्य, आकाश कंदील व भेटवस्तुंचे वाटप करून दिवाळी सणाच्या तोंडावर पूरग्रस्त नागरिकांना पालकमंत्री सरनाईक यांनी मोठा दिलासा दिला.(Guardian Minister Saranaik celebrated Diwali with flood victims)
सोडसावंगी गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे ग्रामस्थांना अन्नधान्य, फटाके, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी पुरग्रस्तांसोबत दिवाळीचा फराळ घेतला. पालकमंत्र्यांनी शेतकरी, शेतमजूर व पशुपालक यांच्याकडून सध्याची परिस्थिती जाणून घेतली. तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अडीअडचणी जाणून घेतल्या, शासनाने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. शासन पुरग्रस्तांच्या पाठीशी खंबीर उभे आहे हे पालकमंत्री सरनाईक यांनी पुरग्रस्तांसोबत दिवाळीचा फराळ करून दाखवून दिले.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी रेवैयाह डोंगरे, तहसीलदार जयवंत पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
भूम तालुक्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. शेतकरी, पशुपालक व नागरिकांचे सर्व काही होत्याचे नव्हते झाले. ग्रामीण भागात अक्षरश उपासमारीची वेळ आली होती मात्र शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तात्काळ तालुक्यात पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचे कीट, शालेय साहित्य, आकाश कंदील, भेटवस्तू व फटाके वाटप करून दिवाळी सणाच्या तोंडावर नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला.
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही
यावेळी पालकमंत्री सरनाईक म्हणाले, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी काम करीत आहोत. यावेळी त्यांनी बाणगंगा व रामगंगा नदीच्या संगमावरील दोन्ही पूल व रस्ता तात्काळ करावा असे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दिले. या तिन्ही कामाचे त्यांनी भूमिपूजन केले. आम्ही शेतकऱ्याऱ्यांना मदत करतोय म्हणजे कोणावर उपकार करत नाहीत. तुमचाच पैसा तुम्हाला देत आहोत. पूरग्रस्त गावात ग्रामसभा घेऊन नुकसानीचे वाचन होणार असल्याचे ते म्हणाले.








